वाटचाल *सुहासिनी करंडक* ची.....
*माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्ट* तर्फे हौशी महिलांसाठी एकपात्री नाट्य अभिनय स्पर्धां घ्याव्यात अशी कल्पना सुचल्यावर मी व मान्यवर नाट्य समीक्षक श्री. वि. भा. देशपांडे यांच्याशी या स्पर्धांच्या स्वरूपाबाबत व आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. ह्या चर्चे दरम्यान स्पर्धेच्या नांवाबाबतही चर्चा झाली. एकपात्री नाट्य सादर करणाऱ्या मा. *सुहासिनी मुळगांवकर* ह्या प्रथम अभिनेत्री होत्या तसेच या नाट्य प्रकारातील त्यांचे योगदान अनमोल आहे. ह्या उपक्रमास मा. सुहासिनी मुळगांवकर ह्यांचे नांव द्यावे असे श्री. वि. भा. देशपांडे यांनी सुचविले आणि अशा रितीने *सुहासिनी करंडक* ची सुरुवात सन २००४ मध्ये झाली.
सुप्रसिध्द अभिनेत्री व दिग्दर्शिका स्मिता तळवलकर, प्रसिध्द अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही 'सुहासिनी करंडक'च्या सल्लागार समितीत साभागी होण्याची विनंती मान्य केली.
*सुहासिनी करंडक* चा आराखाडा तयार झाला असला तरी तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेकांचे साहाय्य झाले. अभिनेता / लेखक संजय डोळे व त्यांचे सहकारी यांनी खूप कष्ट घेतले. भरत नाट्य मंदीर मधून लेव्हल्स मॅनेज करण्यापासून तें स्पर्धा पूर्ण होईपर्यंत मेहनतीची सर्व कामे मनापासून जीव ओतून कसलीही अपेक्षा न करता केली.
खरं म्हणजे आमची गंमतच झाली. *‘पुरुषोत्तम करंडक’*चे संस्थापक यांनी स्पर्धेचे नियोजन कसे करावे याची पूर्ण माहिती, मार्गदर्शन, सल्ले दिले होते. स्पर्धा पुण्यापुरतीच मर्यादित ठेवावी असे बरेच जणांचे मत पडले. पण ट्रस्ट ने केलेले सर्व उपक्रम राज्यस्तरीय होते, मग स्पर्धा देखील राज्यस्तरीयच घ्यायच्या असा माझा आग्रह. 25 सर्धक आले तरी पुष्कळ असे सर्वांचे म्हणणे पडले. आम्ही सर्वांनीच तें मान्य केलं. तसं बजेट तयार केलं, परीक्षक ठरले. मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घ्यावी त्याचीही तयारी झाली. स्पर्धा साधारण 2 तें 2-1/2 तास रोज अशी 2 दिवस चालेल ह्या दृष्टीने सर्व तयारी झाली.
*“झी टीव्ही”* च्या श्री नितीन वैद्य व श्री निखिल साने यांची भेट घेऊन त्यांना सर्व संकल्पना सांगितली. त्यांनाही ती आवडली आणि त्यांनी कसलीही अट न घालता शनिवार /रविवार दिवसभर स्पर्धेच्या माहितीची ओळ चॅनेल वर फ़िरत ठेवली.
*“झी टीव्ही”* च्या या सहकार्यामुळे महाराष्ट्रातून एकंदर 127 अर्ज आले. आणि आमचे नियोजनाचे आर्थिक सकट सर्वच गणित कोलमडले. 3 तास रोज असे 2 दिवस धरलेली स्पर्धा 3 दिवस सकाळी 9 तें रात्री 9 पर्यंत चालू होती.
पण स्पर्धकांच्या इतक्या मोठ्या प्रतिसादाने सर्वच उत्साहित झाले. परीक्षकांपासून ते शिपायापर्यंत सर्वांनीच हसत हसत उत्साहाने स्पर्धा उत्तम रीतीने पार पाडली.
अशा रीतीने स्पर्धेची सुरवात खूपच समाधानाची आणि आनंददायी झाली.
शैला लिमये -
कार्यकारी विश्वस्त
माझी मैत्रीण चॅरीटेबल ट्रस्ट.